हातगाडी लावण्याच्या
कारणावरून पिता-पुत्राला मारहाण
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : हातगाडी लावू नका असे सांगितल्याच्या कारणावरून तिघांनी एका तरुणासह त्याच्या वडिलांना बेदम मारहाण करून जखमी केल्याची दि. २० रोजी दुपारी ४.१५ वाजेच्या सुमारास कामाक्षी चौक परिसरातील बॉम्बे ए-वन तवा स्पॉट हॉटेलजवळ घडली. सरवर जैदी, सैय्यद कायम हुसेन जैदी व बिड्डू (पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा. जैदी गल्ली, देवडी बाजार) अशी मारहाण करणार्यांची नावे असून त्यांच्या विरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोहम्मद इकबाल अहेमद (१९, रा. कुरेशी प्लाझा, बुढीलाईन) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार फिर्यादी यांनी आरोपी सरवर जैदी याला हातगाडी येथे लावू नका, असे सांगितले. या कारणावरून सरवर जैदी याने रागाच्या भरात फिर्यादीला शिवीगाळ करत बुक्क्याने चेहर्यावर मारहाण केली. यात फिर्यादीचा चष्मा फुटून डोळ्याला दुखापत झाली. दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी फिर्यादीचे वडील इरशाद अहेमद आले असता तिघांनी त्यांनाही मारहाण केली. यात ते जखमी झाले. तसेच दोघांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.












